Friday, November 18, 2011

मराठीत बोला


जवळ जवळ १५ वर्षापुर्वी पुणे विद्यापीठातील instrumentation department मधील सुचना फलकावर मराठी भाषेवर एक सुंदर रचना वाचली होती,

तीच आज इकडे लिहीत आहे.

शीर्षक होते:

मराठीत बोला

मराठी लाघवी । गोड ज्ञानेश्वरी ॥
हसे चक्रधर । शब्दखळी ॥

अक्षरे वाजवा । टणत्कार होई ॥
बंद्याची कमाई । रोकठोक ॥

महदंबा माय । मराठी जोजवे ॥
शब्दांना पाजवे । अर्थपान्हा ॥

ओठी होई स्तब्ध । मनी हो प्रक्षुब्ध ॥
अंतरात लुब्ध । शब्द ऐसा ॥

मराठीत बोला । मराठीत चाला ॥
मराठीत घाला । शिव्याशाप ॥

शब्दाचा कोसळे । ज्ञानाचा पर्जन्य ॥
आयुष्य हो धन्य । भिजे रूजे ॥

मराठीत काढा । मोकळ्याने गळा ॥
इंग्रजीचा लळा । झाकू झाकू ॥

बैल घुमे माती । अंगे लोळविती ॥
शब्दे खेळविता । तैसी भाषा ॥

नको पप्पा मम्मी । आई बाबा म्हणा ॥
वात्सल्याच्या खुणा । शब्दोशब्दी ॥

शब्द हो साजण । पुसा त्याचा व्रण ॥
शब्दांचा हा सण । सजवावा ॥

मराठीत म्हणा । नको थँक्यू थँक्यू ॥
थोडे थोडे रांगू । मराठीत ॥

शब्दात दाटली । कैवल्याची साय ॥
ओळीत ही गाय । हंबरली ॥

दारावर पाटी । ऐटीत लावा रे ॥
स्वाक्षरी करा रे । मराठीत ॥

शब्दांनी मांडला । सावळा संसार ॥
गर्वाचा इसार । शब्दालयी ॥

दरबारी म्हणे । मराठीच गाजे ॥
पायी चाळ वाजे । इंग्रजीचे ॥

राम कृष्ण विठू । भाषेविण भेटू ॥
विसाव्याला वाटू । वाळवंट ॥

शब्द ना सोवळा । नाहीच ओवळा ॥
गाभ्यात कोवळा । जिव्हाळतो ॥

चंद्रभागा आली । इंद्रायणी पायी ॥
मराठीची काशी । बुडी मारू ॥

मराठीत मिंधा । बोलता जोराहे ॥
नक्कीच तो आहे । नतद्रष्ट ॥

होऊन निर्भय । गर्जा तिठी तिठी ॥
आपुली मराठी । दिगंताची ॥
आपुली मराठी । दिगंताची ॥