Tuesday, May 29, 2012

घुबडाची कावळ्यांपासुन सुटका

आज सकाळी जुईला घेऊन टेकडीवर गेलो. ती पण विचारल्यावर लगेच हो म्हणुन आवरुन माझ्याबरोबर आली. वर पोहोचल्यावर जरा बसलो तर तेव्हड्यात जवळ जवळ १०० एक कावळे एका पक्ष्याच्या मागे लागलेले दिसले. जर नीट पाहील्यावर तो पक्षी म्हणजे एक घुबड होते. बिचारे जखमी झालेले दिसत होते. ते कावळे त्याला चोची मारत होते.

जर पटकन काही केले नाही तर ते ह्याला मारून टाकतील ह्यात काहीच शंका नव्हती. मी उठलो आणि माझ्या बरोबर टेकडीवर झाडांना पाणी घालणारे एक दोन जण पण धावले. मग आम्ही हातात दगडं घेउन त्या कावळ्यांच्या मागे लागलो. तेव्हड्यात ते घुबड टेकडीवर एका ठिकाणी बसले पण कावळे काय त्याला सोडायला तयार नव्हते. ते घुबड परत इकडे तिकडे उडायला लागले. आम्ही त्याच्या मागे पळत होतो. ते उडत उडत शेजारी कचरा डेपोची जुनी जागा आहे, तिथे गेले. शेवटी एका ठिकाणी ते बसले. मी त्याच्या मागे हळूच गेलो. जेणेकरून त्याला कळू नये आणि ते पुन्हा उडू नये. त्याला पकडायचे ठरवले पण कसे? मला काही पक्षी पकडायचा अनुभव नाही. शेवटी त्याच्यावर कापड टाकुन पकडायचे ठरले. पण नेमके तेही कुठे दिसेना. मग मी अंगातुन बनियन काढला आणि त्याच्यावर टाकणार तेव्हड्यात ते पुन्हा उडाले. कावळे पुन्हा त्याच्या मागे. आम्ही काठ्या घेऊन त्यांच्या मागे लागलो. परत ते घुबड एका चढावर बसले. ह्यावेळी मी जास्त वेळ न दडवता पटकन त्याच्या अंगावर बनियन टाकला आणि त्याला अलगद उचलले. पक्षी उचलण्याचा हा पहिलाच अनुभव! आणि तेही एकदम घुबड! माझ्या बरोबर जे दोघे होते त्यातल्या एकाला माझ्या मागे आणि एकाला पुढे व्हायला सांगितले. जेणेकरून कावळे हल्ला करणार नाहीत.

घुबडाला घेऊन टेकडीवर आलो. विचार होता की कोणाकडे  पक्षीमित्राचा दूरध्वनी क्रमांक असावा तर बघावे. पण कोणाकडेच नाही मिळाला. माझ्या डोक्यात विचार आला की ह्याला एकदम कात्रज प्राणी संग्रहालयातच देऊन यावे.

तोपर्यंत लोकांनी त्याची छायाचित्रे काढुन घेतली होतीच! मग त्याला घेऊन घरी आलो.

त्याचे एक छायाचित्र... किती गोंडस!


एका कागदी बॊक्स मध्ये त्याला सोडले आणि कार काढुन त्याला कात्रज प्राणी संग्रहालयात सोडुन आलो. तेथे मुख्य दरवाज्यापासुन जरा पुढे "प्राणी अनाथालय" आहे. त्या ठिकाणी त्याला सोडले. तेथील सुरक्षारक्षकाने नाव पत्ता वगैरे लिहून घेतले. मग त्याला एका पिंजर्यात सोडले.

तो म्हणाला, १०/१०.३०ला डॊक्टर येवून त्याची तपासणी करतील. काही जखम झाली असेल तर त्याप्रमाणे त्याला इस्पितळात नेवून उपचार करतील आणि मग बरे झाल्यावर निसर्गात सोडून देतील...

तुम्हालाही असा काही जखमी प्राणी/पक्षी आढळुन आल्यास खालील दूरध्वनी क्रमांकावर संपर्क साधावा:
विलास पानसरे: ९८२२९९६६६३
राम भुतकर: ९४२३५२३१४५
कात्रज प्राणी संग्रहालय/अनाथालय: ०२० २४३६७७१२/२४३७०७४७