Sunday, September 1, 2024

शिवकल्याण राजा


|| शिवकल्याण राजा ||

- O -


तीनशे वर्ष, तीनशे वर्ष महाराष्ट्र पारतंत्र्याच्या अंध:कारात चाचपडत होता

वर्षातल्या बाराही आमावस्यांनी जणु गराडा घातला होता

महाराष्ट्राची भूमी घोड्यांच्या टापांखाली वेदनांनी कण्हत होती, गाऱ्हाणं गात होती

प्राणिमात्र झाले दु:खि

पाहता कोणी नाही सुखि

कठीण काळे ओळखी

धरीनांत कोणी

माणसा खावया अन्न नाही

अंथरूण पांघरूण तेही नाही

घरकराया सामग्री नाही

विचार सुचेना काही

अखंड चिंतेच्या प्रवाही पडले लोक

सह्याद्रीच्या कडेकपाऱ्या, सिंधुसागराच्या लाटा

आणि संतसंज्जनांचे टाळ मृदंग

नियतीच्या गाभाऱ्यातील अद्रुश्य शिवशक्तिला आवाहन करीत होते



जय देव जय देव जय जय शिवराया (२)

जय जय शिवराया

या या अनन्यशरणा आर्या ताराया

जय देव जय देव जय जय शिवराया

जय जय शिवराया

या या अनन्यशरणा आर्या ताराया

जय देव जय देव जय जय शिवराया


आर्यांच्या देशावरि म्लेच्छांचा घाला, म्लेच्छांचा घाला

आला आला सावध हो शिवभूपाला, हो शिवभूपाला

सद्र्‌दिता भूमाता दे तुज हांकेला, दे तुज हांकेला

करुणारव भेदुनी तव हृदय न कां गेला ॥१॥


जयदेव जयदेव जय जय शिवराया

जय जय शिवराया

या या अनन्यशरणा आर्या ताराया

जयदेव जयदेव जय जय शिवराया


श्रीजगदंबाजीस्तव शुंभादिक भक्षी, शुंभादिक भक्षी

दशमुख मर्दुनि जी श्रीरघुवर संरक्षी, श्रीरघुवर संरक्षी

ती पूता भूमाता म्लेंच्छांही छळतां, म्लेंच्छांही छळतां

तुजविण शिवराया तिज कोण दुजा त्राता ॥२॥


जयदेव जयदेव जय जय शिवराया

जय जय शिवराया

या या अनन्यशरणा आर्या ताराया

जयदेव जयदेव जय जय शिवराया


त्रस्त अम्ही दीन अम्ही शरण तुला आलों, शरण तुला आलों

परवशतेच्या पाशीं मरणोन्मुख झालों, मरणोन्मुख झालों

साधु परित्राणाया दुष्कृती नाशाया, दुष्कृती नाशाया

भगवन्‌ भगवद्गीता सार्थ कराया या ॥३॥


जयदेव जयदेव जय जय शिवराया

जय जय शिवराया

या या अनन्यशरणा आर्या ताराया

जयदेव जयदेव जय जय शिवराया

- O -




आणि भीमाशंकराच्या जटांत आणि नाणेघाटाच्या ओठात वसलेल्या 

किल्ले शिवनेरीवर उश:क्काल झाला

शिवरायांचा जन्म झाला 

पुत्र जिजाऊ साहेबांना झाला

पुत्र शहाजी राजांना झाला

पुत्र सह्याद्रीला झाला

पुत्र महाराष्ट्राला झाला

पुत्र भारतवर्षाला झाला

शिवनेरीवर शिवबांचा पाळणा आंदोळु लागला

महाराष्ट्राची भाग्यभवानी जिजाऊ साहेबांच्या मुखांनी अंगाई गीत गाऊ लागली



गुणी बाळ असा, जागसी कां रे वायां (२)

नीज रे नीज शिवराया

गुणी बाळ असा, जागसी कां रे वायां


अपरात्रींचा प्रहर लोटला बाई, तरी डोळा लागत नाहीं

हा चालतसे चाळा एकच असला, तिळ उसंत नाही जिवाला

निजवायाचा हरला सर्व उपाय, जागाच तरी शिवराय

चालेल जागता चटका, हा असाच घटका घटका

कुरवाळा किंवा हटका

कां कष्टविशी तुझी सांवळी काया? (२) ॥१॥


ही शांत निजे बारा मावळ थेट, शिवनेरी जुन्‍नरपेठ

त्या निजल्या ना, तशाच घांटाखालीं, कोंकणच्या चवदा ताली

ये भिववाया, बागुल तो बघ बाळा, किती बाई काळाकाळा

इकडे हे सिद्दी-जमान, तो तिकडे अफजुलखान

पलीकडे मुलुखमैदान

हे आले रे, तुजला बाळ धराया (२) ॥२॥


नीज रे नीज शिवराया

गुणी बाळ असा, जागसी कां रे वायां

- O -


अहोरात्र लाथाबुक्क्यांचे अखंड प्रहार सहन करीत उभा असलेला

सह्याद्रिचा स्तंभ कडकडला

दाही दिशा थरथरल्या

काळपुरुषाच्याही कानठळ्या बसल्या

आणि जनशक्तिचा अन् शिवशक्तिचा नरसिंव्ह

ह्या स्तंभातुन प्रचंड गर्जना करीत करीत प्रकटला

अनंत हातांचे आणी अगणित तिक्ष्ण नखाग्रांचे हे नरसिंव्ह होते

शिवराय!


हे हिंदुशक्ति-संभूत-दिप्तितम-तेजा (२)

हे हिंदुतपस्या-पूत ईश्वरी ओजा

हे हिंदुश्री-सौभाग्य-भूतिच्या साजा

हे हिंदुनृसिंहा प्रभो शिवाजीराजा

हे हिंदुनृसिंहा प्रभो शिवाजीराजा

प्रभो शिवाजीराजा


करि हिंदुराष्ट्र हें तूतें । वंदना

करि अंतःकरण तुज, अभि-नंदना

तव चरणिं भक्तिच्या चर्ची । चंदना

गूढाशा पुरवीं त्या न कथूं शकतों ज्या ॥१॥


हे हिंदुनृसिंहा प्रभो शिवाजीराजा

हे हिंदुनृसिंहा प्रभो शिवाजीराजा

प्रभो शिवाजीराजा


जी शुद्धि हृदाची रामदासशिर डुलवी

जी बुद्धि पांच शाह्यांस शत्रुच्या झुलवी

जी युक्ति कूटनीतींत खलांसी बुडवी

जी शक्ति बलोन्मत्तास पदतलीं तुडवी

ती शुद्धि हेतुची कर्मी । राहुं दे

ती बुद्धि भाबड्या जिवां । लाहुं दे

ती शक्ति शोणितामाजीं । वाहुं दे

दे मंत्र पुन्हा तो दिले समर्थें तुज ज्या ॥२॥


हे हिंदुनृसिंहा प्रभो शिवाजीराजा

हे हिंदुनृसिंहा प्रभो शिवाजीराजा

प्रभो शिवाजीराजा

- O -


चढत्या वाढत्या हिंदवी स्वराज्यावर

शत्रुही अहिमहिच्या चढत्या बळाने तुटुन पडत होते

रायगडाच्या अभेद्य तटबंदीसारखीच

स्वत:च्या देहाची तटबंदी 

पावनखिंडीत उभी करुन झुंजणारे 

हे बाजीप्रभु देशपांडे!

देवांनाही हेवा वाटावा

असा इतिहास इथं घडला

ह्या पावनखिंडीत

बाजींच्या देहाची चाळण उडाली होती

रक्ताचे अर्ह्य ओसंडत होते

प्रत्येक अर्ह्य बिंबीत होता

स्वातंत्र्याच्या सुर्या 

आतातरी प्रसन्न हो



सरणार कधी रण प्रभू तरी!

हे कुठवर साहू घाव शिरी? (२)

सरणार कधी रण


दिसू लागले अभ्र सभोती

विदीर्ण झाली जरी ही छाती

अजून जळते आंतर-ज्योती (२)

कसा सावरू देह परि? ॥१॥


सरणार कधी रण प्रभु तरी!

हे कुठवर साहू घाव शिरी?

सरणार कधी रण


होय तनूची केवळ चाळण

प्राण उडाया बघती त्यातुन

मिटण्या झाले अधीर लोचन

खड्‍ग गळाले भूमिवरी ॥२॥

सरणार कधी रण प्रभु तरी!

हे कुठवर साहू घाव शिरी?

सरणार कधी रण


पावन-खिंडित पाउल रोवुन

शरीर पिंजे तो केले रण

शरणागतिचा अखेर ये क्षण (२)

बोलवशिल का अता घरी? ॥३॥


सरणार कधी रण प्रभु तरी!

हे कुठवर साहू घाव शिरी?

सरणार कधी रण

- O -


इथल्या मातीचं ढेकूळ पाण्यात टाका

जो तवंग उमटेल तो इतिहासाचाच

वेड लागल्याशिवाय इतिहास घडत नाही

वेडी माणसंच इतिहास निर्माण करतात

मग त्या इतिहासाचं कोडकौतुक गाण्यासाठी 

आपोआप झंकारुन उठतात

शाहीराची डफ तुणतुणी

आणी थरारुन उठते

महाकवीची नवोन्मेशशालीनी लेखणी

शिवरायांचा चरीत्रचंद्र पाहुन

कवीराज भुषणांचीही प्रतिभा

गंगासागराप्रमाणे उफाळुन आली

- O -


कुंद कहा, पयवृंद कहा, 

अरूचंद कहा सरजा जस आगे ? (२)


भूषण भानु कृसानु कहाब 

खुमन प्रताप महीतल पागे ?


कुंद कहा, पयवृंद कहा, 

अरूचंद कहा सरजा जस आगे ?  (२)


राम कहा, द्विजराम कहा, (३)

बलराम कहा रन मै अनुरागे ?

राम कहा, द्विजराम कहा, 

बलराम कहा रन मै अनुरागे ? (२)


बाज कहा मृगराज कहा 

अतिसाहस मे सिवराजके आगे ?

बाज कहा मृगराज कहा

बाज कहा मृगराज कहा

अतिसाहस मे सिवराजके आगे ?

बाज कहा मृगराज कहा

अतिसाहस मे सिवराजके आगे ?

बाज कहा मृगराज कहा

अतिसाहस मे सिवराजके आगे ?

बाज कहा मृगराज कहा

अतिसाहस मे सिवराजके आगे ?

सिवराजके आगे ? (३)

- O -


प्रतापराव गुजरांस महाराजांचं आज्ञापत्र सुटलं

सर्वबर

स्वराज्यावर वारंवार चालुन येणाऱ्या

गनिमांस गर्दिस मिळविल्याविना

आम्हांस रायगडावर तोंड दाखवु नका

आणि मग!


म्यानातून उसळे तरवारीची पात (२)

वेडात मराठे वीर दौडले सात

म्यानातून उसळे तरवारीची पात

वेडात मराठे वीर दौडले सात (२)


ते फिरता बाजूस डोळे, किंचित ओले (२)

सरदार सहा सरसाउनि उठले शेले

रिकबीत टाकले पाय, झेलले भाले

उसळले धुळीचे मेघ सात निमिषात (२) ॥१॥


वेडात मराठे वीर दौडले सात (२)


आश्चर्यमुग्ध टाकून मागुती सेना (२)

अपमान बुजविण्या सात अर्पुनी माना

छावणीत शिरले थेट भेट गनिमांना

कोसळल्या उल्का जळत सात दर्यात (२) ॥२॥


वेडात मराठे वीर दौडले सात (२)


खालून आग, वर आग, आग बाजूंनी (२)

समशेर उसळली सहस्र क्रूर इमानी

गर्दीत लोपले सात जीव ते मानी

खग सात जळाले अभिमानी वणव्यात (२) ॥३॥


वेडात मराठे वीर दौडले सात (२)


दगडावर दिसतील अजूनि तेथल्या टाचा (२)

ओढ्यात तरंगे अजूनि रंग रक्ताचा

क्षितिजावर उठतो अजूनि मेघ मातीचा

अद्याप विराणी कुणी वाऱ्यावर गातं (२) ॥४॥


वेडात मराठे वीर दौडले सात (२)

- O -


सह्याद्री, समुद्र आणि शिवराय ह्यांनी एकवटुन मांडलेला स्वातंत्र्यसंग्राम विजयी झाला

हिंदवी स्वराज्य साकार झालं

लेकी-सुना, संत-सज्जन, गायी-वासरं सारे सारे आनंदले

हे राज्य व्हावे ही तो श्रींचीच ईच्छा होती

संतांच्या स्वप्नाचा कल्पवृक्ष मोहोरला

वनी आनंद, भुवनी आनंद, 

आनंदी आनंद, वन भुवनी



स्वर्गीची लोटली जेथे

रामगंगा महानदी

तीर्थासी तुळणा नाही ॥१॥


आनंदवनभुवनी (४)


त्रैलोक्य चालिल्या फौजा

सौख्य बंधविमोचने

मोहिम मांडीली मोठी ॥२॥


आनंदवनभुवनी (४)


येथून वाढला धर्मु

रमाधर्म समागमें

संतोष मांडला मोठा ॥३॥


आनंदवनभुवनी (४)


भक्तांसी रक्षिले मागे

आताही रक्षिते पहा

भक्तासी दिधले सर्वे ॥४॥


आनंदवनभुवनी (४)


एथूनी वाचती सर्वे

ते ते सर्वत्र देखती

सामर्थ्य काय बोलावे ॥५॥


आनंदवनभुवनी (४)


उदंड जाहले पाणी

स्नानसंध्या करावया

जप तप अनुष्ठाने ॥६॥


आनंदवनभुवनी (४)


बुडाली सर्व ही पापी

हिंदुस्थान बळावले (२)

अभक्तांचा क्षयो झाला ॥७॥


आनंदवनभुवनी (६)

- O -


इतिहासाच्या पानापानावर साक्षात शिवशंकर

तांडव करीत होता

दोन धृवांचा मृदंग दुमदुमत होता

मन्नथावर तिसरा डोळा विस्फारला जात होता

शिवशस्त्रे असुरावर सुटत होती

आश्चर्यमुग्ध झालेल्या कविराज भुषणाच्या प्रतिभेनेही

शंकराच्या आवेशात रायगडावरच्या राजसभेत मांडले होते तांडव

क्षणात रुद्र तांडव क्षणात आनंद तांडव

- O -


इंद्र जिमि जंभ पर, बाडव सुअंभ पर

रावन सदंभ पर, रघुकुलराज है !

इंद्र जिमि जंभ पर, बाडव सुअंभ पर


पौन बारिबाह पर (२) संभु रतिनाह पर

ज्यों सहसबाह पर, राम द्विजराज है!


इंद्र जिमि जंभ पर, बाडव सुअंभ पर


दावा दृमदंड पर, चीता मृगझुंड पर (२)

भूषन वितुंड पर, जैसे मृगराज है !


इंद्र जिमि जंभ पर, बाडव सुअंभ पर


तेज तम‍ अंस पर, कान्ह जिमि कंस पर (२)

त्यों मलिच्छ बंस पर, सेर सिवराज है!


इंद्र जिमि जंभ पर, बाडव सुअंभ पर

रावन सदंभ पर, रघुकुलराज है !

इंद्र जिमि जंभ पर, बाडव सुअंभ पर

- O -


किल्ले रायगडावर हिंदवी स्वराज्याचं सार्वभौम सिंहासन झळाळु लागलं

भारतवर्षातील ईंद्रप्रस्थ, देवगिरी, चितोड, कर्णावती, विजयनगर, वारंगळ

आणि अशाच भंगलेल्या सर्व सार्वभौम सिंहासनांच्या जखमा 

रायगडावर बुजल्या आत

ही भुमी राजश्रीरायविराजीत सकलसौभाग्यसंपन्न झाली


शतकांच्या यज्ञातून उठली एक केशरी ज्वाला

दहा दिशांच्या ह्रिदयांमधुनी अरुणोदय झाला

अरुणोदय झाला


शिवप्रभूंची नजर फिरे अन् उठे मुलुख सारा

दिशादिशा भेदीत धावल्या खङगाच्या धारा

हे तुफान स्वातंत्र्याचे

हे उधाण अभिमानाचे

हे वादळ उग्र विजांचे

काळोखाचे तट कोसळले, चिरा चिरा ढळला ॥१॥


दहा दिशांच्या ह्रिदयांमधुनी अरुणोदय झाला

अरुणोदय झाला (२)


कडेकपारी घुमू लागले विजयाचे गान

जळल्या रानातूनी उमलले पुन्हा नवे प्राण

रायगडावर हर्ष दाटला, खडाचौघडा झडे

शिंगाच्या ललकारीवरती भगवा झेंडा उडे

शिवराय भाग्य देशाचे

हे संजीवन प्राणांचे

हे रुप शक्ति-युक्तिचे

हा तेजाचा झोत उफाळुन, सृष्टितुन आला ॥२॥


दहा दिशांच्या हृदयांमधुनी अरुणोदय झाला

अरुणोदय झाला (२)


गंगा सिंधू, यमुना गोदा कलशांतुन आल्या

शिवरायाला स्नान घालुनी धन्य धन्य झाल्या

धिमी पाऊले टाकित येता (२)

रुद्राचा अवतार

अधीर हृदयांतुनी उमटला हर्षे जयजयकार ॥३॥


प्रौढप्रताप पुरंदर क्षत्रीयकुलावतंस

सिंहासनाधिश्वर महाराजाधीराज शिवछत्रपती महाराज


शिवछत्रपतींचा जय हो

श्रीजगदंबेचा जय हो

या भरतभूमीचा जय हो

जयजयकारातुनी उजळल्या शतकांच्या माला

दहा दिशांच्या हृदयांमधुनी अरुणोदय झाला

अरुणोदय झाला

अरुणोदय झाला


- O -


महाराजांनी आणि त्यांच्या जिवलगांनी

देव मस्तकी धरुन तीन तपे हलकल्लोळ केला

स्थितप्रज्ञ विरागीही आनंदानं गहिवरले

त्यांना शिवरायांच्या रुपात दिसु लागली महामेरुसारख्या भगिरथाची प्रतीमा

- O -


निश्चयाचा महामेरु । बहुत जनांसी आधारु ।

अखंड स्थितीचा निर्धारू । श्रीमंत योगी ॥


नरपति हयपति गजपति । गडपति भूपति जळपति ।

पुरंदर आणि शक्ति । पृष्ठभागीं ॥


यशवंत कीर्तिवंत । सामर्थ्यवंत वरदवंत ।

पुण्यवंत नीतिवंत । जाणता राजा ॥


आचारशील विचारशील । दानशील धर्मशील ।

सर्वज्ञपणें सुशील । सकळां ठायीं ॥


धीर उदार गंभीर । शूर क्रियेसि तत्पर ।

सावधपणें नृपवर । तुच्छ केले ॥


देव धर्म गोब्राह्मण । करावया संरक्षण ।

हृदयस्थ झाला नारायण । प्रेरणा केली ॥


या भूमंडळाचें ठायीं । धर्म रक्षी ऐसा नाहीं ।

महाराष्ट्रधर्म राहिला कांही । तुम्हां कारणे ॥


कित्येक दुष्ट संहारिला । कित्येकांसी धाक सुटला ।

कित्येकांस आश्रयो जाहला ।

शिवकल्याणराजा ॥ शिवकल्याणराजा ॥ शिवकल्याणराजा ॥


- O -

No comments: